अयोध्या - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कडक नियम लागू करत आहेत. लॉकडाऊन असतानाही देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशभरात कोरोनाची लागण असलेले ४० टक्के लोक हे तबलिगी जमातच्या संपर्कात आलेले आहेत. अशात बाबरी मशिदीचे माजी पक्षकार इकबाल अंसारी यांनी जमातींवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशात आत्तपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ९७४ इतकी झाली आहे. यामध्ये ५९० रुग्ण हे जमातीशी जोडलेले आहेत. अशात आता अयोध्या वादातील मुस्लीम पक्षकार राहिलेले इकबाल अंसारी म्हणाले, की देश वाचवण्यासाठी धर्माच्या भिंती घालू नये. सर्व धर्मांनी एकत्र येऊन अशा रोगाचा सामना करायला हवा.
इकबाल अंसारी यांनी ईटीव्हीशी साधला संवाद -
ईटीव्हीशी संवाद साधताना ते म्हणाले, जमाती मुद्दामहून हा रोग देशभरात पसरवण्याचे काम करत आहे. त्यांच्याविरोधात कठीण कारवाई व्हायला पाहीजे. तसेच, देशद्रोहाचा खटला देखील दाखल करण्यात यावा, अशा जमातीचे आम्ही अजिबात समर्थन करत नाही.
देशभरात आत्तापर्यंत १४ हजार ३७८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ११९०६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर, ४८० रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. १९९१ रुग्ण बरे झाले आहेत. तर, उत्तर प्रदेशात ९७४ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ५९० रुग्ण हे जमाती तसेच त्यांच्या संपर्कात आलेले आहेत.