गलवान व्हॅलीतील झटापटीनंतर चीन आणि भारतातील सीमावाद पुन्हा उफाळून आला. चीनी सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने वातावरण आणखी तापले आहे. या घटनेत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. चीनी सैन्याची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली. याच पार्श्वभूमीवर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. चीनसोबत आता डिप्लोमसी नको, तर जशास तसे उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वाटाघाटीच्या बहाण्याने चीनने आपली फसवणूक केली. आपल्या सैन्याला दगा दिला. आपण २००९ मध्ये चीनसोबत केलेल्या पीस अॅन्ड ट्रॅन्क्वीलीटी करारामुळे शस्त्रांचा वापर करण्याचे टाळले. याचा गैरफायदा चीनने घेतला. या वेळी पहिल्यांदाच लाठ्यांचा वापर झाला. हिंसाचार करून चीनने या कराराला छेद दिला. त्यामुळे आता सैन्याला लष्करीदृष्ट्या पूर्ण मुभा देण्याची गरज ब्रिगेडियर महाजन यांनी व्यक्त केली.
मागील काही दिवसांत भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये ९० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही आपले यश आहे. चीनच्या बाबतीत बोलताना महाजन यांनी चाणाक्यनितीचे उदाहरण दिले. जागतिक राजकारणात 'शत्रूचा शत्रू आपला मित्र' असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, जपान, नॉर्थ कोरिया यांसारख्या देशांना घेऊन आपण चीनवर दबाव आणू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न आपण करतच आहोत. सद्या अर्ध्याहून जास्त जग चीनच्या विरोधात आहे. याचा फायदा भारताला होणार असल्याचे मत ब्रिगेडियर महाजन यांनी व्यक्त केले.
लडाख प्रांतात तसेच सीमावर्ती भागात आपण मोठ्या प्रमाणात रस्ते तसेच पायाभूत सुविधा उभारत आहोत. यामुळे येणाऱ्या काळात लष्कराला कुमक पोहोचवणे सोपे होणार आहे. चीनला याच गोष्टीचा राग असून ते आपल्याला सीमावर्ती भागात लक्ष्य करत आहेत. या ठिकाणी जोझीला बोगदा तसेच हिमाचलमधून 'खरदुंगला-पास'ने कनेक्टिव्हीटी वाढवत आहोत. राष्ट्रीय महामार्ग -१ ला पर्यायी रस्त्यांची उभारणी येणाऱ्या काळत होत आहे. यामुळे चीनची नाराजी उघड होत आहे.