नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने 13 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तब्बल 48 हजार 916 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 757 जणांचा मृत्यू झाला.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 13 लाख 36 हजार 861 वर पोहचली आहे. तर यामध्ये 4 लाख 56 हजार 71 सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत उपचारानंतर तब्बल 8 लाख 49 हजार 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 31 हजार 358 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.
देशात कोरोना चाचणी क्षमता वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. आजपर्यंत तब्बल 1 कोटी 58 लाख 49 हजार 68 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर शुक्रवारी एकाच दिवसात 4 लाख 20 हजार 898 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सध्या सात लसी विकासाच्या विविध टप्प्यात आहेत, त्यापैकी दोन लसींना मानवांवर क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मानवी चाचणी येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा आयसीएमआरचा मानस आहे.