नवी दिल्ली - देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून कोरोना रुग्णांच्या संख्येने 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तब्बल 40 हजार 425 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 681 जणांचा मृत्यू झाला.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 11 लाख 18 हजार 43 वर पोहोचली आहे. तर यामध्ये 3 लाख 90 हजार 459 सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत उपचारानंतर तब्बल 7 लाख 87 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 27 हजार 497 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.
देशातील राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात आतापर्यंत 11 हजार 854 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 3 लाख 10 हजार 455 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 29 हजार 32 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 69 हजार 569 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 22 हजार 793 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 628 जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात 48 हजार 355 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 70 हजार 693 कोरोनाबाधित तर 2 हजार 481 जणांचा बळी गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 146 , पश्चिम बंगालमध्ये 1 हजार 112 तर कर्नाटकमध्ये 1 हजार 331 जणांचा बळी गेला आहे.
कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.