नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून ड्रोन तंत्रज्ञान घेण्याची मागणी भारत करू शकतो. जानेवारी महिन्यात इराकमध्ये अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात इराणचा लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला ठार मारले. त्यावेळी वापरण्यात आलेले ड्रोन अमेरिकेकडून विकत घेण्यास भारत इच्छुक आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अमेरिकेचे ड्रोन अचूकपणे सर्वांची नजर चुकवत लक्ष्यापर्यंत पोहचले आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. या तंत्रज्ञानाचा उपयोग पाकिस्तान किंवा इतर देशात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध करण्यात येऊ शकतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले. २६/११ चा मुंबई हल्ला, पुलवामाचा हल्ला यामागील सूत्रधार पाकिस्तानात लपून बसले आहेत. त्यांना लक्ष्य करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येऊ शकते.
जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद पाकिस्तानमध्ये उघडपणे फिरतात. त्यामुळे भारताने हे तंत्रज्ञान विकत घेतल्यास त्याचा उपयोग भारताला दहशतवादाविरोधातील लढाई लढण्यासाठी होऊ शकतो.