बंगळुरू - कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांचे आघाडी सरकार वाचवण्यासाठी बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान भाजपच्या एका खासदाराने कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला खूप आनंद होईल, असे खासदार उमेश जाधव यांनी म्हटले आहे.
'खरगे यांना मुख्यमंत्री पद दिले तर मला आनंद होईल. एका दलित व्यक्तीला हे पद मिळाले तर, माझ्यासाठी हे अत्यंत आनंददायी असेल,' असे जाधव यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे हे भाजप खासदार उमेश जाधव यांचे गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खरगे यांचा पराभव होऊन जाधव निवडून आले. जाधव हेही काँग्रेसमधून बंड करून बाहेर पडलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते आहेत. आता जाधव यांचे वक्तव्य समोर आले आहे.
'काँग्रेसमधील दलित नेत्यांच्या एका गटातील लोक त्यांच्यापैकी कोणाला तरी मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी करत आहेत,' असे म्हटले जात आहे. आता भाजप खासदार जाधव यांनी मल्लिकार्जुन खरगे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला खूप आनंद होईल, असे म्हटले आहे.