नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये राजकीय सत्तानाट्य पाहायला मिळत आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. एकीकडे काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपला 'हिम्मत असेल तर माझ्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करा', असे खुले आव्हान केले आहे.
जर भाजपला वाटते की, आमच्याकडे बहूमत नाही. तर त्यांनी माझ्या सरकारविरोधात अश्विवास प्रस्ताव दाखल करावा. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यास ते का घाबरत आहेत?, असा सवाल मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
मध्य प्रदेशच्या विधानसभेत आज बहुमत चाचणी घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, यावर भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आहेत. 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने मुख्यमंत्री कमलनाथ सरकारवर संकट आले असून यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.