लिपो - भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32 विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील लिपो येथे सापडल्याची माहिती देण्यात आली आहे. हवाई दलाने याविषयी ट्विट केले आहे. आसाममधील जोरहाट विमानतळावरून उड्डाण केलेले आयएएफ एएन-३२ हे विमान ३ जूनला १२ वाजून २५ मिनिटांनी बेपत्ता झाले होते. या विमानात वायुसेनेचे १३ कर्मचारी होते. अरुणाचल प्रदेशातील मेनचुका हवाईक्षेत्रात हे विमान बेपत्ता झाले होते.
'#AN-32 विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील लिपो येथून उत्तरेकडे १६ किलोमीटरवर आणि टाटो येथून ईशान्येकडे समुद्रसपाटीपासून १२ हजार फूट उंचीवर सापडले आहेत. हवाई दलाच्या #IAF Mi-17 हेलिकॉप्टरला या परिसरात शोध घेताना हे अवशेष आढळून आले,' असे ट्विट हवाई दलाने केले आहे. हे विमान बेपत्ता झाल्यापासून याचा कसून शोध सुरू होता.
हे विमान बेपत्ता होऊन ८ दिवस उलटल्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या लिपो परिसरात याचे अवशेष सापडले आहेत. हवाई दलाकडून विमानाची माहिती देणाऱ्यासाठी ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शनिवारी एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ विमानाच्या शोधकार्याची माहिती घेण्यासाठी जोरहाट येथे गेले होते.
हेलिकॉप्टर्सद्वारे विमानाचा रात्रंदिवस शोध घेण्यात आला. रात्री लेसर यंत्रणेद्वारे शोध घेण्यात आला. याबरोबरच नौदलाचे पी-८१ आणि ग्लोबल सर्व्हिलेन्स विमाने, एनटीआरओ उपग्रहाद्वारे शोध सुरू होता. तसेच, पहिल्या दिवसापासूनच सुखोई आणि सी-१३० जे विमाने आणि काही पथके प्रत्यक्ष जमिनीवरुन शोध घेत होती.