चेन्नई - आयकर विभागाने तामिळनाडूतील एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेवर कारवाई केली आहे. या कारवाईत त्या शिक्षण संस्थेने १५० कोटी रुपयांचा कर भरला नसल्याचे समोर आले. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने(सीबीडीटी) याबाबत माहिती दिली.
शिक्षण संस्थेच्या विविध कार्यालयांवर छापे -
काल (बुधवारी) या शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये कोयम्बतून, एरोडे, चेन्नई आणि नमाक्कल येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. या छाप्यामध्ये ५ कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात असून काही लॉकर्स अद्याप उघडले नाहीत. त्यामध्ये आणखी रक्कम सापडण्याची शक्यता सीबीडीटीने व्यक्त केली आहे.
आयकर विभागाकडे आली होती तक्रार -
सीबीडीटी आयकर विभागाची कार्यकारी संस्था आहे. या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांकडून जमा केलेले सर्व प्रवेश शुल्काची नोंद होत नसल्याची तक्रार सीबीडीटीकडे आली होती. त्या आधारावर सीबीडीटीने ही कारवाई केली. सीबीडीटीच्या पथकाने काही इलेक्ट्रॉनिक मशीनही ताब्यात घेतल्या असून त्यांचीही तपासणी होणार आहे.