नवी दिल्ली - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने संपूर्ण जगात पुन्हा भीती पसरली आहे. ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने विमान सेवा बंद केली आहे. दरम्यान, भारतातील कोविड-१९ टास्क फोर्स सतर्क झाली आहे. नव्या विषाणूने बाधित असलेल्या प्रवाशांना अलगीकरणात ठेवून विषाणूचा प्रसार रोखणे यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कोरोना टास्क फोर्सची बैठक
राष्ट्रीय स्तरावरील कोरोना टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत नवा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याची रणनिती आखण्यात आली. तसेच कोरोना चाचणी, नियमावली, रुग्णांची निगराणी यासंबंधी आढावा घेण्यात आला. ब्रिटनमध्ये सापडलेला नवा कोरोना विषाणू जास्त घातक असून त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे जर एखादा प्रवासी नव्या विषाणूने बाधित असेल तर त्याला शोधून त्याच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यास प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे.
प्रवासी विमानतळावरून झाले फरार
इंग्लडहून भारतात आलेल्या काही प्रवाशांना कोरोना असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सर्वांना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र, तरीही काही प्रवासी विमानतळावरून फरार झाले होते. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे. दिल्ली विमानळावर उतरलेला एक कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी रेल्वेमार्गे आंध्रप्रदेशात गेला होता. इतर चार प्रवासी कोरोना चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर पळून गेले होते. त्यांचा तपास लागला आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूचा संसर्ग आहे की नाही, याची तपासणी अद्याप प्रयोगशाळेत सुरू आहे. अद्याप एकाही व्यक्तीस नव्या विषाणूची लागण असल्याचे पुढे आले नाही, ही दिलासादायक बाब आहे.