नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने २८ हजार अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. सैन्यांच्या या हालचालीमुळे राज्यात काहीतरी वेगळे घडणार आहे, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर केंद्रीय गृहमंत्र्यालयाने उत्तर दिले आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर सैनिकांच्या स्थानामध्ये बदल करण्यात येतो. तसेच सुरक्षेसाठी किती सैन्य तैनात केले आहे, ही माहिती जाहीर केली जात नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
लष्कराने १०० तुकड्या (१० हजार सैन्य) जम्मू काश्मीरमध्ये तैनात केल्या आहेत. त्यात वाढ करुन ही संख्या २८० तुकड्या (२८ हजार) करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यता सीआरपीएफ दलाचे जवान आहेत, असे सुत्रांनी सांगितले. सैन्य वाढवल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी घरामध्ये अन्न आणि औषधांचा साठा करुन ठेवण्यास सुरुवात केली आहे.
सुरक्षेच्या आढाव्यानंतर आणखी सैन्य जम्मू काश्मीरमध्ये तैनात केले जाऊ शकते, अशीही चर्चा केली जात आहे. सैनिकांचे प्रशिक्षण, बदली ही कायम घडणारी गोष्ट आहे, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सुरक्षाव्यवस्थेला काही धोका असेल तर सैन्यांच्या हालचाली बाबतची माहिती जाहीर केली जात नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
संविधानात जम्मू काश्मीर राज्याबाबत असलेले कलम ३७० आणि ३५ -ए केंद्र सरकार रद्द करणार असल्याच्या अफवा नागरिकांमध्ये पसरत आहेत. त्यामुळे फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सरकार विरोधात जनमत एकत्र करायला सुरुवात केली आहे. सरकारने संविधानात काही बदल केले तर खोऱ्यातील नागरिक याचा एकजुटीने विरोध करतील असे, मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.