हरिद्वार - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे, याचा विचार करून हरिद्वार येथील कनखलच्या युवकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी साथी अॅप बनवले आहे. याचा पोलिसांना फायदा होईल असा त्याचा दावा आहे.
उज्जवल धीमान याने अॅपमध्ये पाच फीचर्स दिले आहेत. याच्या सहकार्याने पोलीस नागरिकांच्या घरी न जाता सर्वेक्षण करु शकणार आहेत. यासोबत कोरोनाशी संबधित माहिती सहजरित्या उपलब्ध होणार आहे.
अॅपमधील फीचर्स
सर्वेक्षण-
पोलीस प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यास मदत होईल.
अहवाल-
एखाद्या ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग करत असल्याचे आढळल्यास त्याचे छायाचित्र घेऊन अॅपमध्ये अपलोड करता येईल. पोलीस त्या छायाचित्राच्या आधारावर कारवाई करतील.
संपर्क-
अॅपमध्ये कोरोनाशी संबंधित हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. याचा वापर करुन कोरोनासंबधी माहिती उपलब्ध होऊ शकते.
कोविड ट्रॅकर-
अॅपच्या माध्यमातून आपल्या परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची माहिती आलेखाच्या स्वरुपात उपलब्ध होऊ शकेल.
वेबसाइट-
WHO (जागतिक आरोग्य संघटना) च्या वेबसाईटशी अॅपला लिंक करण्यात आले आहे. यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी घ्यायची जबाबदारी आणि इतर माहिती लगेच उपलब्ध होईल.
उज्जवल धीमानने अॅपचे नाव 'साथी' ठेवले आहे.कोरोना विरुद्धच्या लढाईत पोलीस प्रशासनला याची मदत होईल. प्रशासनाला यामध्ये इतर फीचर्स वाढवायची असली तर ते वाढवू शकतात, असे धीमान याने म्हटले आहे.