गोरखपूर – 'अनामिका शुक्ला' घोटाळा उघडकीला आल्यानंतर बनावट कागदपत्रे देवून नियुक्ती मिळविणाऱ्या 51 शिक्षकांचा पर्दाफाश झाला आहे. या शिक्षकांना गोरखपूर प्रशासनाने निलंबित केले आहे. या शिक्षकांनी नोकरी मिळविण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची फसवणूक केली आहे.
गोरखपूर प्राथमिक शिक्षा अधिकारी भूपेंद्र नारायण सिंह यांनी शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली होती. या तपासणीत अनेक बनावट शिक्षक गेल्या काही वर्षांपासून वेतन घेतल्याचे दिसून आले. अशा बनावट शिक्षकांना प्रशासनाने निलंबित केले आहे. या शिक्षकांनी कागदपत्रांवर खोट्या सह्या करून नोकऱ्या मिळविल्या होत्या. या बनावट शिक्षकांनी उत्तर प्रदेश सरकारला13 कोटींचा चुना लावला आहे. या नुकसानीच्या आकडेवारीबाबत प्रशासनाकडून अजून माहिती घेतली जात आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंह यांनी 39 जणांविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. निलंबित शिक्षकांकडून पैसे वसूल करण्यासाठी प्रशासनाने पथकाची नियुक्ती केली आहे. विशेष तपास पथकाकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे. तर आरोपींना पकडण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात आले आहे.
दरम्यान, अनामिका शुक्ला ही शिक्षिका 25 शाळांमधून 1 कोटी रुपये वेतन घेत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार हा चव्हाट्यावर आला आहे. शुक्लाप्रमाणे बनावट कागदपत्रे देवून नियुक्त्या मिळविलेले शिक्षकांवर सरकारने कारवाई सुरू केली आहे.