नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना संकटात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. सरकारने 50 लाख रुपयांची आरोग्य विमा योजना सप्टेंबरपर्यंत म्हणजे आणखी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे.
मार्चमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती. या विमा संरक्षणाचा कालावधी 90 दिवसांचा होता. ही योजना 30 जूनला संपणार होती. त्यावर आज सरकारने ही मुदत आणखी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे.
सफाई कर्मचारी, वॉर्ड बॉईज, परिचारिका, आशा कार्यकर्त्या, निमवैद्यकीय, तंत्रज्ञ, डॉक्टर आणि तज्ञ आणि इतर आरोग्य कर्मचारी या विशेष विमा योजनेत समाविष्ट असतील. कोविड-19 रूग्णांवर उपचार करणाऱ्या कोणत्याही आरोग्य व्यावसायिकांना काही दुर्घटना झाल्यास या योजनेंतर्गत त्यांना 50 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.
सर्व सरकारी आरोग्य केंद्रे, कल्याण केंद्रे आणि केंद्र तसेच राज्यातील रुग्णालये या योजनेंतर्गत समाविष्ट असतील, सुमारे 22 लाख आरोग्य कर्मचा्यांना या महामारी विरोधात लढा देण्यासाठी विमा संरक्षण देण्यात येईल.