कोलकाता - गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपमध्ये सामिल झालेले 17 नगरसेवक पुन्हा गोरखा जनमुक्ती मोर्चात सामिल झाले आहेत. 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयासाठी आम्ही काम करणार असल्याचे आज बिमल गुरुंग म्हणाले.
दार्जिलिंग नगर पालिकाचे 17 नगरसेवक गेल्या वर्षी जूनमध्ये नवी दिल्लीत भाजपामध्ये सामिल झाले होते. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप बिमल गुरुंग यांनी भाजपवर केला आहे. मी गेल्या 17 वर्षांपासून भाजपासोबत आहे. त्यांनी कधीच दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यांनी आमचा फक्त मतदान यंत्राप्रमाणे वापर केला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी नेहमीच आश्वासने पूर्ण केली आहेत, असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालसाठी भाजपानं कसली कंबर -
बिहार विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री अमित शाह यांनी एकही सभा घेतली नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये ममता यांचा पराभव करण्यासाठी अमित शाह स्वत: मैदानात उतरले आहेत. बंगालमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे 2021च्या विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत भाजपाने आत्तापासूनच कंबर कसली आहे.