विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) - येथील साईनार फार्मा कंपनीत बेन्जिन गॅस गळती झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना येथील परवाडा फार्मा सिटी येथे घडली. घटनेनंतर जिल्हाधिकारी विनयचंद आणि पोलीस आयुक्त मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. ही घटना सोमवारी रात्री घडली.
यातील जखमींवर आर. के. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एल. व्ही. चंद्रशेखर (37), पी. आनंदबाबू (41), डी. जानकीराम (24) आणि एम. सूर्यनारायण (29) अशी जखमींची नावे असून चंद्रशेखर यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आर. नरेंद्र आणि एम. गौरीशंकर अशी मृतांची नावे आहेत.
तीन दिवसांतील ही राज्यातील दुसरी घटना -
कर्नूल जिल्ह्यातील एसपीवाय कंपनीत 27 जूनला वायू गळती झाली होती. त्यात कंपनीच्या महाव्यवस्थापकाचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले होते. ही घटना नांदल्या भागात घडली होती. श्रीनिवासराव असे मृत महाव्यवस्थापकाचे नाव होते. कंपनीतील एका पाइपमधून अमोनिया वायूची गळती झाली होती. दुरुस्ती केलेला पाइपच फुटल्याने ही वायूगळती झाली होती. एसपीवाय ही कंपनी नंदी ग्रुपच्या मालकीची आहे.