बंगळुरू - गगनयान मोहीम केवळ अंतराळात मनुष्य पाठवण्यासाठी नाही, तर मोठ्या प्रमाणात जागतिक गुंतवणुकीसाठीही एक संधी आहे, असे मत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केले. "मानवी अंतराळयात्रा आणि अन्वेषण - सध्याची आव्हाने आणि भविष्यातील संधी" या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या संगोष्ठीच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
केवळ मानवांना अंतराळात पाठवण्यासाठी नाही, तर अवकाशात एक अंतराळ स्थानक तयार करून, त्याद्वारे तिथे मानवी अस्तित्व कायम ठेवण्याचा गगनयान मोहिमेचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही योजना मोठ्या प्रमाणात जागतिक गुंतवणुकीसाठी संधी आहे. रोजगारापासून सुरक्षेपर्यंत (अन्न, ऊर्जा इत्यादी), बहुतेक देशांमध्ये समान उद्दीष्टे आहेत आणि या भागीदारीमुळे ती उद्दीष्टे पूर्ण करण्यास मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.
आम्ही या मोहिमेचे तीन टप्पे विचारात घेतले आहेत. डिसेंबर २०२० आणि जून २०२१ मधील दोन मोहिमा, आणि त्यानंतर २०२१ मध्ये मानवी अंतराळ उड्डाणाचे प्रात्यक्षिक असे हे तीन टप्पे असणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गगनयान मोहिमेमधून आपल्याला नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच आपल्या क्षमताही वाढणार आहेत. सर्वांचा समान सहभाग असलेला हा केवळ इस्रोचा नाही, तर संपूर्ण देशाचा प्रकल्प असणार आहे, असे ते म्हणाले. सध्या तंत्रज्ञान करत असलेली प्रगती पाहता, भविष्यात केवळ एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पुरेसे असणार नाही. प्रादेशिक गरजांवर लक्ष देण्यासाठी प्रादेशिक अंतराळ स्थानकांची गरज पडणार आहे. याच गोष्टीवर गगनयान लक्ष केंद्रीत करणार आहे, असे सिवन यांनी सांगितले.
गगनयान मोहिमेबाबत बोलताना सिवन म्हणाले, की इस्रोकडे आधीच लाँचर, री-एंट्री सिस्टम, रिकव्हरी सिस्टम (पॅराशूट), क्रू एस्केप सिस्टम आदी आहेत. “मानवी जीवन विज्ञान प्रणाली, सहाय्य प्रणाली आणि उर्वरीत आवश्यक प्रणाली आता विकसित केल्या जात आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांमधून ठराविक वैमानिकांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. विजय राघवन हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत बोलताना त्यांनी संपूर्ण जगाने यावर एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. अंतराळात ज्याप्रमाणे सर्व देश एकत्रितरित्या काम करत आहेत, ते पाहता हे शक्य असल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. अंतराळात याआधीही अनेक मानव जाऊन आले आहेत. मात्र, अंतराळात जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आणखी प्रयत्न व्हायला हवेत, आणि ते होताना दिसतही आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा : स्वामी नित्यानंदविरोधात इंटरपोलने जारी केली 'ब्लू नोटीस'