नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणू रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. कोरोना, नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) यासंबंधातील अपयश हे भविष्यातील हार्वर्ड बिझिनेस स्कूलमध्ये अभ्यासाचा विषय असेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधत करत असून कोरोनाविरोधातील लढाई आपण 21 दिवसांमध्ये जिंकू असे मोदी सांगत आहेत. मात्र, व्हिडिओमध्ये ग्राफच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी कोरोनाविरोधातील लढाईला 100 पेक्षा अधिक दिवस झाल्याचे दाखवले आहे. कोरोना रुग्णांचे सर्वांत जास्त प्रमाण असलेल्या जागतिक देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचंही दाखवण्यात आलं आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. यात 2 लाख 53 हजार 287 रुग्ण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. 4 लाख 24 हजार 233 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 19 हजार 693 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.