नवी दिल्ली- 29 ऑक्टोबरपासून दिल्ली मधील महिलांना आता मोफत बस सुविधा मिळणार आहे. स्वांतत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या महिलांना मोफत मेट्रो आणि बस सेवा देण्याची घोषणा याआधीच केली होती. मात्र, हा लाभ केव्हापासून मिळेल याबाबत उत्सुकता होती. अखेर स्वांतत्र्यदिन आणि रक्षाबंधनचे औचित्य साधत केजरीवाल यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
आज राखीचा पवित्र दिवस आहे. आज बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याबदल्यात भाऊ बहिणीला भेट देतो. दिल्लीच्या सर्व बहिणींसाठी एक भाऊ म्हणून मी आपले कर्तव्य पार पाडत आहे. दिल्लीतील महिलांना मोफत बस सेवा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेत वाढ होईल, तसेच त्यांचे सशक्तीकरण होईल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.
केजरीवाल यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली. काही लोकांना वाटते मी पैसे खात आहे. पण मी पैसे स्वीस बँकेत जमा करत नाही किंवा भ्रष्टाचार करत नाही. लोकांनी दिलेल्या टॅक्सच्या पैशातून मी हे करत आहे, असे ते म्हणाले.