सहारनपूर - महामारीच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी धार्मिक स्थळांची दारं बंद करण्यात आली. यानंतर सर्व धर्मस्थळांमध्ये सामुदायिक प्रार्थना बंद झाल्या. मात्र, सध्या इस्लाम धर्मातील महत्वाचा रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे मुस्लीम समुदायाला नमाज अदा करण्यासाठी मशीदीत जावे लागते.
मात्र, महामारीच्या प्रसारामुळे धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मुस्लीम नागरिक घरात नमाजाचे पठन करत आहेत. काही ठिकाणी धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी देखील होत आहे. तसेच मशिदी काही काळ नमाजासाठी उघडण्यात याव्या किंवा पीपीई किट्स घालून नमाज पठन करण्याची परवानगी मागण्यात आलीय. अशातच सहारनपूरमधील एका मौलवींनी कायद्याचे पालन करत घरातच नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच रमजानमध्ये देखील सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले आहे.
दारुल उलूम मुफ्ती यांच्या खंडपीठाने यासंबंधी अध्यादेश काढला आहे. ईदुल फितर पर्यंत लॉकडाऊन कायम राहिल्यास मशिदींमध्ये पाच पेक्षा अधिक लोकांना नमाज पठन करण्याची परवानगी नसणार आहे. त्यामुळे अशावेळी मुस्लीम बांधवांनी आपापल्या घरातच नमाज अदा करावी, असे मौलवींनी सांगितले. तसेच मशिदीत नमाज अदा न करू शकलेल्यांना नमाज-ए-ईद माफ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.