नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असून भारतामध्येही त्याचे झपाट्याने संक्रमण होत आहे. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता खबरदारी म्हणून केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर केले आहे. तब्बल ५ हजार कोच विलगीकरण कक्षात रुपांतरीत केले आहेत. यामध्ये 80 हजार खाट असून जवळपास 2 आठवड्यांच्या अल्पावधीत रेल्वेने आपले लक्ष्य गाठले आहे.
कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर भारतीय रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीसाठी देशातील प्रत्येक विभागीय रेल्वेला लक्ष्य दिले आहे. एका दिवसामध्ये 375 कोच तयार करण्याचा सरासरी आकडा आहे. देशातील एकूण 133 ठिकाणी रेल्वेच्या प्रवासी गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात येत आहे. रेल्वेमध्ये औषधे आणि खाद्यपदार्थांचीही व्यवस्था केली गेली आहे. स्लीपर कोचमधील मधला बर्थ तसेच साईडचे बर्थ काढून टाकण्यात आले आहेत.
देशामधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, आपल्याला मोठ्या प्रमाणात विलगीकरण कक्षांची गरज भासणार आहे. देशातील कोणत्याही भागात, लवकरात लवकर विलगीकरण कक्ष उपलब्ध व्हावेत यासाठी रेल्वेच्या डब्यांचे रुपांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महामारीसोबत लढण्यासाठी रेल्वे सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे, जास्तीत जास्त लोकांना यातून वाचवणे शक्य होईल.