हैदराबाद - भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती केंद्राने दिली. यासोबत त्यांनी ही बाब दिलासादायक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी देशातील लोकसंख्येचे प्रमाण अजूनही "अत्यंत अतिसंवेदनशील" असल्याचे सांगत, खबरदारी बाळगण्याचे आवाहन देखील केले. जागतिक स्तरावर पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होताना पाहायला मिळत असून यात विशेषत: अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. ही बाब चिंताजनक आहे. याउलट भारतात रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब दिलासादायक असल्याचे एनआयटीआय आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
देशात मृत्यू दर कमी होत आहे आणि ते दररोज ४०० च्या खाली आहे. याशिवाय कोरोना रुग्णांचा आकडा २२ हजाराहून खाली आला आहे. मागील जुलै महिन्यात ही आकडेवारी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळे ही बाब दिलासा देणारी आहे. याबाबत चांगले काम होत आहे, असे देखील पॉल म्हणाले. अजूनही सावधगिरी बाळगणे गरजेचे असून यात हलगर्जीपणा करू नये, अशा इशारा देखील त्यांनी दिला.
देशात आतापर्यंत १५.५५ करोड कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील ६.३७ टक्के चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. आता कोरोना लसीकरणासाठी सरकारकडून आराखडा तयार केला जात आहे. यात अनेक राज्यांना कोरोना लसीचा साठा करण्यासाठी लागणारी साधने देण्यात आली आहेत, असे राजेश भूषण यांनी सांगितलं.
नवी दिल्ली
दिल्लीच्या न्यायालयाने मंगळवारी, ३६ परदेशी नागरिकांची निर्दोष मुक्तता केली आहे. या नागरिकांवर दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजेरी लावत कोरोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वे मोडल्याप्रकरणी खटला सुरू होता. मार्चमध्ये निजामुद्दीन मरकझ हॉटस्पॉट म्हणून उदयास आल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत होती. व्हिसा अटींचे उल्लंघन केल्याबद्दल, मिशनरी कार्यात गुंतून सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी सुमारे 955 परदेशी लोकांवर आरोप दाखल केले होते. दुसरीकडे भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल श्रीकांत यांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीच्या बेस रुग्णालयात उपचार सुरू होते, याची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र -
मुंबई - राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3 हजार 442 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 71 हजार 356 इतकी झाली आहे. तसेच आज 4 हजार 395 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. राज्यात आतापर्यंत 48 हजार 339 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 17 लाख 66 हजार 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 93.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. असे असले तरी नऊ जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आलं आहे. यामुळे सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. दरम्यान, उत्सवात उसळलेल्या गर्दीमुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली असल्याचा अंदाज आहे.
तमिळनाडू -
चेन्नई - मंगळवारी आयआयटी-मद्रास कॅम्पसमधील आणखी ७९ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यात विद्यार्थी, शिक्षकांचा समावेश आहे. यासह आता कॅम्पमधील बाधित रुग्णांची संख्या १८३ इतकी झाली आहे. दरम्यान, कॅम्पस हॉटस्पाट ठरल्यानंतर आता शाळा कॉलेज ७ डिसेंबरपासून सुरूवात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
केरळ
तिरुअनंतपुरम - केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोरोना लस राज्यातील सर्व नागरिकांना मोफत दिले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यांनी ही घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थाची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केली होती. यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून केरळ राज्य निवडणूक आयोगाने विजयन यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.