हैदराबाद - भारतात कोरोनाचा कहर सुरू असून जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशामध्ये एकूण रुग्णांची संख्या ४१ लाखांपेक्षाही जास्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, ब्राझीलमध्ये ४० लाख ४१ हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तेथे ६० लाखांपेक्षाही जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
सद्य स्थितीत भारतात प्रत्येक दिवशी १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. आत्तापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्येही जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझील आणि अमेरिकेत कोरोनामुळे भारतापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार करता इतर देशात भारतापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांमध्ये भारतात तब्बल ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४१ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.
दिल्ली -
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत गेल्या १५ दिवसांत घरात आयसोलेशेनमध्ये असलेल्यांमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय, दुसरीकडे कंटेन्मेंट झोनची आकडेवारीही ९७६ पर्यंत वाढली आहे.
तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर दिल्ली मेट्रोची सुविधा तीन टप्प्यांवर सुरू होणार आहे. त्यापैकी पहिला टप्पा आज सोमवारपासून सुरू होईल. प्रवासाच्या दिवसाच्या स्थितीनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये असलेली स्टेशने बंद राहतील, असे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मध्य प्रदेश -
भोपाळ - कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पाचौरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, राज्यात सामान्य स्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शनिवारी शंभरपेक्षा कमी लोकांसह धार्मिक मेळाव्यास परवानगी देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे दुर्गा पूजा सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय, सरकारने राज्यातील रूग्णालयात बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तराखंड -
डेहराडून - उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री मदन कौशिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना एम्स ऋषिकेश येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री सुबोध उनियाल यांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. उनियाल यांचा मुलगा आणि पुतण्या यांना कोरोनाची लागण झाली आहे.