हैदराबाद : देशात शुक्रवारी एका दिवसातील सर्वोच्च कोरोना रुग्णांची नोंद झाली. काल झालेल्या ७७,२६६ रुग्णांच्या नोंदीनंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३३.८७ लाख झाली आहे. यासोबतच, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ६१,५२९वर पोहोचली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी, २४ तासांमध्ये देशात नऊ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. देशभरात आतापर्यंत ४ कोटी लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
या पार्श्वभूमीवर, पाहुयात देशातील कोरोनासंबंधीच्या ठळक घडामोडी..
नवी दिल्ली : दिल्ली सरकार हे आता कोरोना चाचण्यांच्या संख्येमध्ये वाढ करणार आहे. यासाठी मोठ्या पातळीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी सांगितले.
यासोबतच, दिल्ली उच्च न्यायालय एक सप्टेंबरपासून खुले होण्यासाठी सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे न्यायालयात केवळ व्हर्च्युअल सुनावण्या होत होत्या. तब्बल पाच महिन्यांनी आता हे न्यायालय पुन्हा खुले होणार आहे.
चंदिगड : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 'एमसेवा व्हॉट्सअप चॅटबॉट' या सेवेचे अनावरण शुक्रवारी केले. सामान्य नागरिकांना कोरोनासंबंधी कोणतीही शंका असल्यास ते या बॉटसोबत बोलून खात्री करुन घेऊ शकतात.
पंजाब विधानसभेच्या सत्रावरून परतल्यानंतत एका काँग्रेस आमदाराला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. निर्मल सिंग यांचा तीन दिवसांपूर्वीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मंत्री आणि जदयू नेते एच. डी. रेवान्ना यांना कोरोनाची लागण झाल्येचे निश्चित झाले आहे. पक्षातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
चेन्नई : तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधील काँग्रेस खासदार एच वनस्थकुमार यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यावर चेन्नईमध्ये कोरोनावरील उपचार सुरू होता. १० ऑगस्टला कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना अपोलो रुग्णालयात झाखल केले होते.
देहराडून : उत्तराखंडमध्ये सशस्त्र सेना बलाच्या ५० जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ग्वालाडाममधील एका कॅम्पमध्ये ही बाब आढळून आली. शुक्रवारपर्यंत उत्तराखंडमध्ये १७,२७७ कोरोना रुग्णांची नोेद झाली आहे. तर, आतापर्यंत ११,७७५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ५,२७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.