हैदराबाद - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशाभरात मंगळवारी 14 हजार 933 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 312 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 40 हजार 215 वर पोहोचली आहे. यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 78 हजार 14 इतकी आहे. केंद्रिय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 14 हजार 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
- महाराष्ट्र -
मुंबईत एका जेष्ठ शिवसेना कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर येथील शिवसेना भवन सील करण्यात आले आहे. अहवालानुसार, शिवसेना भवनाची इमारत 8 दिवसांसाठी सील केली जाईल. तर चार दिवसांपूर्वी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी याठिकाणी भेट दिली आहे.
दरम्यान, मुंबईतील 70 बेपत्ता कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आरोग्य विभागाची मदत घेणार आहेत.
- नवी दिल्ली -
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रॅम्प अप चाचणी आणि कोरोनाच्या नियंत्रणासाठी उपाय राबविले आहे. मात्र, मागील 24 तासांत 18 हजार चाचण्यांच्या तुलनेत केवळ 14 हजार 682 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, असे 22 जूनच्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिसून आले आहे.
यापुर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते की, कोरोना चाचण्यांमध्ये तीन पट वाढ झाली असून दिल्लीत प्रत्येक दिवसाला 18 हजार चाचण्या करण्यात येत आहेत.
- राजस्थान -
दक्षिण राजस्थानमधील बंसवारा जिल्ह्याने एक नवीन बेंचमार्क गाठला आहे. मंगळवारी दोन कोरोनाबाधितांना घरी सोडल्यानंतर येथील रुग्णांचा बरे होण्याचा दर 100 टक्के झाला आहे. आतापर्यंत 92 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला. तर बाकी सर्वजण बरे झाले आहेत.
- कर्नाटक -
राज्याची राजधानी असलेल्या बंगळूरुत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील 4 पोलीस ठाण्यांना मंगळवारी सील करण्यात आले आहे. अहवालानुसार, हळसूर गेट स्टेशन येथील एका हेडकॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर अनेक अधिकाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ठाण्यात जेरबंद असलेला आरोपीला कोरोनाची लागण झाल्यानंतर बनासवाडी पोलीस ठाणे सील करण्यात आले आहे. दरम्यान, पुट्टुनहल्ली पोलीस ठाण्यातही एक आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर पुट्टुनहल्ली पोलीस ठाणेही सील करण्यात आले आहे.
- छत्तीसगड -
राजनंदगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर विधानसभा आणि सचिवालयाची इमारत 24 ते 28 जून दरम्यान बंद राहणार आहे. या काँग्रेस आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या परिवाराला तसेच स्टाफलाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
- मध्यप्रदेश -
मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यानुसार, राज्य प्रशासन कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी राजधानी भोपालमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करेल. राज्यातील कोरोनाबाधित बरे होण्याचा दर 76 टक्के आहे, असा दावाही मंत्री मिश्रा यांनी केला.
मागील 24 तासांत राज्यात 175 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 78 इतकी झाली आहे. तर एकूण मृतांची संख्या 521 वर पोहोचली आहे.
- उत्तराखंड -
राज्यात मंगळवारी आणखी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर 103 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 505 वर पोहोचली आहे. उधमसिंह नगर जिल्ह्यात एका 29 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.
- ओडिशा -
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांनी आत्महत्या केली आहे. यामुले एकूण मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. तर मंगळवारी 167 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5 हजार 470 वर पोहोचली आहे, अशी राज्य आरोग्य विभागाने दिली. तर ज्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ते कटक जिल्ह्यातील होते.
- पंजाब -
राज्यात आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 169 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 397 वर पोहोचली आहे. तर, 105 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.
- झारखंड -
मागील 24 तासांत राज्यात 42 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 140 वर पोहोचली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील पुरी येथे ऐतिहासिक घटना घडली. यानंतर रांचीतील जगन्नाथपूर मंदिराची रथयात्राही पुढे ढकलण्यात आली. रांचीतील 9 दिवसांच्या या महोत्सवात सुमारे अडीच ते तीन लाख लोक सहभागी होतात. आता हा महोत्सव 1 जुलै किंवा त्यापूर्वी होणार आहे.