जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांचे आमदार पुन्हा राजस्थानात येण्याचे संकेत दिले आहेत. ते येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. तसेच, यांच्यापैकी कोणाचेही आमदार राजस्थानात आले तर त्यांना सुरक्षा मिळेल, असेही ते म्हणाले. बाहेरून आलेल्या सर्वांना सुरक्षितता पुरवणे हे सरकारचे कर्तव्यच आहे, असे ते म्हणाले.
'बाहेरच्या राज्यातून किंवा इतर कुठुनही आमदार येवोत किंवा सर्वसामान्य लोक, पर्यटक येवोत; त्यांची जबाबदारी आम्ही आमचे कर्तव्य मानतो. त्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. मात्र, अद्याप असे कोणी येणार असल्याची माहिती मला मिळालेली नाही,' असे गेहलोत म्हणाले. 'तसेच, कोणी आमदार राजस्थानला येणार असतील तर, त्याची माहिती माझ्याही आधी माध्यमांना मिळेल,' असे म्हणत त्यांनी माध्यमांची फिरकीही घेतली.
महाराष्ट्रात सध्या राजकीय संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेकडून ४४ आमदारांना राजस्थानात जयपूरमध्ये सुरक्षित ठिकाणी पाठवले जाऊ शकते. गेहलोत यांच्याकडूनही असेच संकेत मिळत आहेत.