नवी दिल्ली - ईशान्य दिल्ली हिसांचाराच्या घटनेवरून राहुल गांधी आणि इतर काँग्रेस खासदारांनी संसद परिसरामध्ये आज आंदोलन केले. महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती बांधुन खासदारांनी जातीय दंगलीचा निषेध केला. दिल्ली हिंसाचारात मृतांचा आकडा ५३ वर पोहोचला आहे. काँग्रेसने या घटनेवर लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चेची मागणी करत अनेक वेळा कामकाज बंद पाडले आहे.
गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे कामकाज ११ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आत्तापर्यंत हिंसाचारात ५३ जणांचा मृत्यू झाला असून ३०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.
दिल्ली हिंसाचारावर लोकसभेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी उर्वरीत अर्थसंकल्प सत्रापर्यंत काँग्रेसच्या ७ खासदारांना निलंबित केले आहे. सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अध्यक्षांनी ही कारवाई केली.
काँग्रेस पक्षाला घाबरवण्यासाठी सदस्यांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. खासदार गौरव गोगोई, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर या आंदोलनात सहभागी झाले होते. 'आम्ही घाबरणार नाही, दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी सतत करत राहु, असे गौरव गोगोई यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस खासदारावर केलेली कारवाई मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे काँग्रेसने सांगितले.