नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'भारतीय अर्थव्यस्थेमध्ये मोठी गंभीर समस्या असल्याचं मोदी सरकारच्या आर्थिक सल्लागारांनी अखेर मान्य केले', असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
अखेर मोदींच्या आर्थिक सल्लागारांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गंभीर समस्या असल्याचं मान्य केले. भारतीय अर्थव्यवस्था मंदीकडे जात असल्याचं आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून सांगत आहोत. आता आम्ही जे सांगितले त्याचा स्वीकार करा आणि या मोठ्या समस्येवर उपाय काढा, असे राहुल गांधींनी टि्वट केले आहे. देशाची अर्थव्यवस्था आर्थिक संकटामध्ये आहे, असे विधान नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केल्यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
यापुर्वीही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी टि्वट करत इशारा दिला होता. 'अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरली असून बोगद्याच्या शेवटी कोणताच प्रकाश नाहीये. तुमच्या अकार्यक्षम अर्थमंत्री तुम्हाला प्रकाश असल्याचे सांगत असतील तर मंदीची गाडी जोरात धावत येत आहे, हे लक्षात ठेवा,' असे टि्वट त्यांनी केले होते.
काय म्हणाले राजीव कुमार-
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर वक्तव्य केले. भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याची कबुली नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत असून गेल्या ७० वर्षांमध्ये पाहायला मिळाली नाही, अशी वाईट स्थिती सध्याच्या घडीला निर्माण झाली असल्याचे राजीव कुमार यांनी म्हटले होते.