नवी दिल्ली - भारतीय राजकारणात सध्या काँग्रेस पक्ष वाईट काळातून जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या देशातील एका सर्वात जुन्या पक्षाची कामगिरी सतत खालावत आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुका आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी लाजिरवाणी होती. निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल आम्ही सर्वजण चिंतित आहोत. आमच्या लोकांचा खालच्या (ग्राउंड स्तरावर) पातळीवरील लोकांच्याबरोबरचा संपर्क तुटला आहे, असे पक्षाच्या खराब कामगिरीविषयी बोलताना ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
आम्हाला विशेषत: बिहार आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकीच्या निकालांनंतर चिंता वाटू लागली आहे. पराभवासाठी मी नेतृत्वाला दोष देत नाही. आमच्या पक्षाशी संबंधित लोकांचा जिल्हा, तालुका आणि पंचायतींपर्यंत खालच्या पातळीवर जनतेशी संपर्क राहिलेला नाही. लोकांचे पक्षावर प्रेम असले पाहिजे. गेल्या 72 वर्षात काँग्रेस पक्ष सर्वात खालच्या स्थानी फेकला गेला आहे.
..तोपर्यंत कोणतीही निवडणूक जिंकता येणार नाही
वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आझाद बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निवडणुका पंचतारांकित (फाईव्ह स्टार) संस्कृतीने जिंकल्या जाऊ शकत नाहीत. आजच्या नेत्यांची सर्वात मोठी समस्या ही आहे की, त्यांना पक्षाचे तिकीट मिळाले की, प्रथम पंचतारांकित हॉटेल बुक करण्यावर भर दिला जातो. गोर-गरिबां वस्तीतील जाड्या-भरड्या रस्त्यावरूनही तुम्हाला चालावे लागेल. पंचतारांकित संस्कृती सोडण्याची वेळ आता आली आहे. आम्ही ही पद्धत सोडत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक जिंकता येणार नाही.
पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील. त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती होत नाही तोपर्यंत ते कुठेही जाणार नाहीत. परंतु, सर्वांना पदाधिकारी केल्यावर त्यांना त्यांची जबाबदारी समजेल. आता सर्वांना पक्षात पद देण्याची वेळ आली आहे, असे पदाधिकार्यांवर टीका करताना आझाद म्हणाले.
पक्षाला पुन्हा जिवंत करायचे असेल तर..
आम्ही प्रत्येक पातळीवर आपली कार्यपद्धती बदलत नाही, तोपर्यंत कोणत्याच गोष्टी बदलणार नाहीत. नेतृत्त्वाने कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्याची गरज असून पक्षातील पदांसाठी निवडणुका घेण्याची गरज आहे. कोरोना महामारीमुळे मी गांधी कुटुंबाला सध्या क्लीन चिट देत आहे, कारण ते आता काही करू शकत नाहीत. आमच्या मागण्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आमच्या बहुतेक मागण्यांवर त्यांनी सहमती दर्शविली आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पर्याय व्हायचा असेल आणि पक्षाला पुन्हा जिवंत करायचे असेल तर आमच्या नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांसाठी निवडणुका घेतल्या पाहिजेत, असेही आझाद म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही उघडपणे असंतोष व्यक्त करत पक्षाचे दुर्लक्ष जाहीर केले आहे. कपिल सिब्बल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, 'कॉंग्रेस पक्ष दीड वर्षापासून अध्यक्षांशिवाय कसे काम करत आहे? आणि कार्यकर्त्यांनी तक्रार कुठे करावी? सिब्बल यांच्या विधानावरून कॉंग्रेसमध्ये सध्या वाद सुरू झाला आहे. एकापाठोपाठ एक पलटवार करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.