लखनऊ - अयोध्येतील बाबरी मशिद विध्वंसप्रकरणी सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयात साध्वी ऋतंभराची चौकशी करण्यात येणार आहे. मशिद पाडल्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून सीबीआयने सर्व आरोपींची चौकशी सुरु केली असून न्यायालयात आरोपींना आणण्यात येत आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते विनय कटियार यांच्यासह अनेक आरोपींना याआधी सीबीआय विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचे न्यायाधीश सुरेंद्र यादव यांच्या उपस्थितीत सीआरपीसी 313 कलमांनुसार आरोपींना प्रश्न विचारण्यात येत आहेत.
सीबीआय न्यायालयात साध्वी ऋतंभरासह अन्य आरोपींची बाजू मांडणारे वकील के. के. मिश्रा यांनी ईटीव्ही भारतशी फोनवर चर्चा केली. सोमवारी साध्वी ऋतंभरा यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सीआरपीसीच्या 313 कलमानुसार त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात येतील, असे मिश्रा म्हणाले. सीबीआय विशेष न्यायालयात वरिष्ठ भाजप नेते विनय कटियार यांच्यासह 12 इतर आरोपींना याआधी प्रश्न विचारण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, साध्वी उमा भारती, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासह इतर आरोपींची चौकशी बाकी आहे. वय आणि सुरक्षेचा मुद्दा पुढे करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे सुनावणी घेण्याची विनंती लालकृष्ण अडवाणी यांच्यासह इतर नेत्यांनी न्यायालयाला पत्र लिहून केली होती. मात्र, यासंबधी कोणतीही व्यवस्था अद्याप करण्यात आली नाही.
मंगळवारी मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती सीबीआयचे विशेष न्यायालयात हजर होणार आहेत. तर इतर आरोपींनाही त्यानंतर बोलविण्यात येणारा आहे, असे बचाव पक्षाचे वकील के. के मिश्रा यांनी सांगितले.