देहराडून : उत्तराखंडच्या पिठोरगडमध्ये, भारत-चीन सीमेजवळील एक पूल कोसळला आहे. आज (सोमवार) एक अवजड ट्रक जेव्हा त्या पुलाला ओलांडत होता, तेव्हा त्या ट्रकच्या वजनामुळे हा पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये ट्रकच्या चालकासह आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. लियाम जोहर खोऱ्यातील मुनस्यारी तालुक्यात असलेल्या धापा-मिलाम रस्त्यावर ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत ट्रकचा चक्काचूर झाला. तर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमध्ये बांधकामाचे अवजड साहित्य होते. मिलाम ते चीनच्या सीमेपर्यंत बांधल्या जात असणाऱ्या ६५ किलोमीटरच्या 'मोटर-वे'साठी हे साहित्य नेण्यात येत होते.
हा पूल कोसळल्यामुळे आजूबाजूच्या गावांमधील सुमारे सात हजार लोकांच्या दळणवळणावर परिणाम होणार आहे. तसेच, आयटीबीपी आणि लष्कराच्या जवानांसाठी पाठवण्यात येणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीवरही परिणाम होणार आहे.
दरम्यान, भारत-चीन आणि भारत-नेपाळ सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लष्कराने उत्तराखंडच्या पिठोरगडमधील सीमा भागात सर्वेक्षण केले. पिठोरगडमधील धारचुला तालुक्याची सीमा या दोन्ही देशांना लागून आहे, त्यामुळे या भागात हाय अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा : पिठोरगडमधील भारत-नेपाळ सीमा भागाचे सैन्याने केले सर्वेक्षण..