नवी दिल्ली - तेलंगाणामधील भाजपचे आमदार राजा सिंह यांनी कोरोनाविरोधात 'चिनी विषाणू परत जा' घोषणाबाजी केली होती. यावर भारतातील चीनी दूतावासाने भाजपचे आमदार राजा सिंह यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला. चीनचे वाणिज्य दूतावास लियू बिंग यांनी याप्रकरणी राजा सिंह यांना पत्र लिहिले आहे.
चीन देशाने कोरोनाबद्दल संपूर्ण जगाला सांगितले. याचा अर्थ असा नाही की, विषाणूची उत्पत्ती चीनमधील वूहानमध्ये झाली आहे. विषाणूची उत्पत्ती जगात कोठेही झाली असेल, असे लियू बिंग यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
गेल्या 5 एप्रिलला कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकत्र येत रविवारी रात्री 9 वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा आणि मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले होते. तेव्हा राजासिंग यांनी टार्च आणि मशाल पेटवल्या. आपल्या कार्यकर्त्यासह एकत्र येत 'चिनी विषाणू परत जा', अशी घोषणाबाजी केली होती. राजा सिंग हे हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे वादग्रस्त आमदार आहेत.