इंफाळ - आज मणिपूर विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह आद विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. त्यासाठी विशेष एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले आहे. यामध्ये आमदारांनी केलेल्या मतांवरून भाजपाची सत्ता राज्यात टिकणार की नाही? हे स्पष्ट होणार आहे.
भाजप आपल्या १८, तर काँग्रेसने २४ आमदारांना व्हीप जारी केला असून सभागृहात उपस्थित राहून पक्षाच्या वतीने मत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा ६० आमदरांचे संख्याबळ होते. मात्र, तिघांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि तिघांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे आमदारांचे संख्याबळ ५३ वर आले आहे. तरीही आम्ही ३० पेक्षा अधिक आमदारांचे मत जिंकून विश्वासदर्शक ठरावाची चाचणी यशस्वीपणे पार करू, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष एस. टिकेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या २८ जुलैला काँग्रेसने भाजप सरकारविरोधात अविश्वास ठरावा आणला होता. काँग्रेस आमदार केश्यम मेघाचंद्रसिंह यांनी हा ठराव आणला होता.