कोलकाता - देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सात दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. सलग आठवडाभर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सात दिवस आराम देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत घोषणा केली. राज्याचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी आरोग्य मंत्रालयाला आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाच्या कार्य प्रणालीत फेरबदल करण्यात येतील.
डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या गोंधळामुळे आराम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना सात दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सचिव आणि आरोग्य मंत्रालय त्यानुसार कार्यवाही करतील, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना दिली.
आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनाही आरामाची गरज आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकांशी चर्चा करुन पोलिसांनाही सुट्ट्या देता येतील का?याचा निर्णय घेतला जाईल, असेही बॅनर्जी म्हणाल्या.