नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज(शनिवार) मोदी सरकारवर टीका केली. देशविरोधी आणि गरीबविरोधी शक्ती देशात तिरस्कार आणि हिंसा पसरवत असून मोदी सरकारच्या काळात देशात लोकशाहीला डावलून हुकूमशाहीचा प्रभाव वाढत असल्याचा घणाघात त्यांनी भाजपवर केला.
छत्तीसगड विधानसभा इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. नवा रायपूर येथे या नूतन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल आणि इतर मंत्री या व्हर्च्युअल बैठकीला उपस्थित होते.
'मागील काही दिवसांपासून देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या लोकशाहीपुढे नवं आव्हान उभं राहिलं आहे. देश एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. एकमेकांत भांडण लावून सत्ताधारी आणि देशविरोधी शक्ती देशात हिंसा आणि तिरस्कार पसरवत आहेत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. लोकशाहीवर तानाशाहीचा प्रभाव वाढवून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत', असे त्यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपवर हल्ला केला.
'चांगल्या विचारांवर वाईट विचार वरचढ ठरत आहे. लोकशाही मार्गाने स्थापन केलेल्या संस्थांना उद्ध्स्त करण्यात येत आहे. लोकांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. देशातील युवक, आदिवासी, महिला, शेतकरी, व्यापारी आणि जवानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे', असे गांधी म्हणाल्या.
आणखी दोन वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळून दोन वर्ष पूर्ण होतील. देशाची लोकशाही आणि राज्यघटना भविष्यात धोक्यात येईल, अशी कल्पनाही आपल्या पूर्वजांनी कधी केलीही नसेल. नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींनी देशाची राज्यघटनेचे रक्षण करता येणार नाही, तर भावनांनी तीचे रक्षण करता येईल, असे त्या म्हणाल्या.