बंगळुरु - सीएए, एनआरसीविरोधी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या तरुणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता तिला जामीन नाकारण्यात आला. अमुल्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसीदेखील उपस्थित होते. या प्रकारानंतर त्यांनी तातडीने त्या तरुणीच्या हातातील माईक हिसकावून घेत या प्रकाराचा निषेध केला.
काय आहे प्रकरण?
'संविधान वाचवा' हा कार्यक्रम काल(गुरुवारी) कर्नाटकातील बंगळुरु येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अमुल्या नावाची मुलगी व्यासपीठावर बोलण्यासाठी आली. व्यासपीठावर आल्यानंतर, संयोजकांनी या तरूणीला बोलण्याची संधी देत तिच्याकडे माईक सूपूर्द केला. यावेळी तिने समोरील लोकांना आपल्यासोबत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यास सांगितले. त्यामुळे असदुद्दीन औवैसी हे देखील उपस्थित होते. त्यांनी या तरुणीला घोषणा देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातून माईक हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला.
या सर्व गोंधळानंतर पोलिसांनी त्या तरूणीला ताब्यात घेतले. त्यानंतर जमलेल्या लोकांना संबोधित करत ओवैसींना या प्रकरणाचा तीव्र निषेध केला. माझा किंवा माझ्या पक्षाचा या तरूणीशी काहीही संबंध नाही. आम्ही घडलेल्या घटनेचा निषेध करतो. कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिला इथे बोलवायला नको होते. आम्ही भारतासाठी आहोत आणि आम्ही आपले शत्रूराष्ट्र पाकिस्तानला पाठिंबा देत नाही. आम्ही केवळ भारताला वाचवण्यासाठी हे आंदोलन करत आहोत, असे ओवैसींनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जदयूचे नगरसेवक इमरान पाशा यांनी असा आरोप केला आहे, की या तरूणीला विरोधी पक्षाने पाठवले होते. याठिकाणी व्यासपीठावर बोलणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये या महिलेचे नाव नव्हते. त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.