नवी दिल्ली - सध्या चीन-भारत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपले सैन्यांना सीमेवर तैनात केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य 'बोफोर्स हॉवित्झर तोफा' ऑपरेशनसाठी सज्ज करत आहे. तोफांची तांत्रिकदृष्टया तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना लडाखमध्ये तैनात केले जाणार आहे.
'बोफोर्स हॉवित्झर तोफा' या 1980च्या काळात तोफखान्यात सामील झाल्या होत्या. हॉवित्झर तोफा लहान आणि उंच अशा दोन्ही ठिकाणावरून लक्ष्य भेदण्यास सक्षम आहेत. लडाखमध्ये लष्कराचे अभियंते बोफोर्स हॉवित्झर तोफाची तांत्रिकदृष्टया तपासणी करत असून काही दिवसांमध्ये तोफा सीमेवर दाखल होतील. या तोफांची सतत सर्व्हिसिंग आणि देखभाल करावी लागते.
सन 1999च्या कारगिल युद्धात बोफोर्स तोफांनी आपले कौशल्य सिद्ध केले होते. या तोफांनी पाकिस्ताननेच उंच पर्वतावर बांधलेले बंकर व खंदक सहजपणे नष्ट करून पाकिस्तान सैन्याला धडा शिकवला होता.
जुलैच्या मध्यावधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करीस्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. चीनकडून सीमेवरील सैन्य वाढवण्यात आल्यानंतर भारताने सैनिकांची संख्या वाढवली आहे.