पूर्व गोदावरी (आंध्र प्रदेश) - हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजे असताना शेजारच्याच आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात सामूहिक बलात्कार करून महिलेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी एका ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला. ही घटना पूर्व गोदावरी जिल्ह्यातील इवलावरम मंडळ, जी वेमवरम या भागात घडली. यातील एका नराधमाला पोलिसांनी पकडले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - 'बलात्कार प्रकरणातील आरोपींना 6 महिन्यांच्या आत व्हावी फाशीची शिक्षा'
संबंधित महिलेच्या पतीचा व मुलाचा मृत्यू झाला असून तिची मुलगी हैदराबादमध्ये राहते. त्यामुळे ही महिला या भागात एकटीच राहत असल्याचा फायदा घेऊन नराधमांनी हे कृत्य केले आहे. या घटनेचा निपटारा आम्ही सायंकाळपर्यंत करू, असे येथील पोलीस अधीक्षकांनी सांगितले. हैदराबादमध्ये लागोपाठ घडलेल्या बलात्काराच्या दोन घटनांमुळे सर्व देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा बलात्काराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.