नवी दिल्ली - दिल्लीतील १०६ वर्षांच्या आजोबांनी ईच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूला मात दिली आहे. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडणारे ते सर्वात ज्येष्ठ नागरिक आहेत. १७ दिवस उपचारानंतर ते ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आला आहे.
वयोवृद्धांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका असल्याचे वैद्यकीय दृष्ट्या मान्य करण्यात आले आहे. मात्र, १०६ वर्षांच्या मुख्तार अहमद यांनी कोरोना हरवले आहे. मुख्तार यांची उदाहरण नक्कीच इतर कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये लढण्याचे बळ निर्माण करेल. कोरोनाची लढाई जेवढी शारिरीक स्तरावर लढावी लागते तेवढेच मानसिकदृष्याही कणखर असणे गरजेचे आहे.
१४ एप्रिलला त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर राजीव गांधी सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. १ मे ला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर मुख्तार अहमद यांना कोरोना मुक्त घोषित करण्यात आले.
मुख्तार यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झालेली आहे. मुलापासून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. मुलावर डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनाही कोरोची लागण झाली होती. आता फक्त त्यांचा मुलगा उपचार घेत असून सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत.