कोलकाता - काही दिवसापूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली. भाजपा आणि काँग्रेसचे अनेक नेते तृणमूल काँग्रेसची वाट धरत आहेत. बंगालमधील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते अभिजित मुखर्जी आज टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अभिजीत आज संध्याकाळी टीएमसीत सामील होतील.
अभिजित मुखर्जी यांनी काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तसेच अभिजीत यांनी बनावट लस प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शविला होता. 'विशिष्ट व्यक्तीच्या चुकीच्या कृतीसाठी पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरणे योग्य नाही. जर तसे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याच्या खटल्यांसाठी जबाबदार धरता येईल, असे टि्वट त्यांनी केले होते.
राजकारणात येण्यापूर्वी सरकारी सेवेत -
प्रणव मुखर्जी यांचे मोठे पुत्र अभिजीत मुखर्जी राजकारणात येण्यापूर्वी सरकारी सेवेत होते. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर जंगीपूर मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. तेव्हा अभिजीत मुखर्जी यांनी 2012 मध्ये पश्चिम बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा जंगीपूरमधून खासदार म्हणून निवडले गेले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रणव मुखर्जी 2004 आणि 2009 मध्ये दोनदा जंगीपूरमधून निवडून आले होते.
हेही वाचा - 'भाजपात प्रवेश करून चूक झाली' रस्त्यावर फिरत लाउडस्पीकरवरून कार्यकर्ते मागताय माफी
हेही वाचा - ‘घर का लडका घर वापस आया’; मुकुल रॉय यांच्या टीएमसी प्रवेशावर ममतांची प्रतिक्रिया