लखनऊ : उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये झालेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. आग्रा-लखनऊ महामार्गावर सुमारे डझनभर गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये तीन लोक जागीच ठार झाले असून, आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे. सर्व जखमींना सैफई वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
डंपर चालकाने घेतलेला शॉर्टकट ठरला घातक..
मिळालेल्या माहितीनुसार, उलट्या दिशेने येणाऱ्या एका डंपरमुळे हा अपघात झाला. महामार्गावर तयार करण्यात आलेल्या आपत्कालीन गेटचा वापर करण्यास केवळ अत्यावश्यक कामांसाठीच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या डंपर चालकाने शॉर्टकट मारण्यासाठी या गेटमधून आपला डंपर नेला. हा डंपर लखनऊकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाताच, त्यादिशेने वेगाने येणारे वाहन डंपरला धडकले. पाहता पाहता, या वाहनाच्या मागे येत असलेल्या सुमारे दहा-बारा गाड्या एकमेकांना धडकल्या.
शेतकऱ्यांनी केली मदत..
यानंतर आजूबाजूच्या शेतांमध्ये काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी अपघातग्रस्तांची मदत केली. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले, आणि गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासही मदत केली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने बाजूला केली.
हेही वाचा : 'आत्मनिर्भर भारत' घडवण्यात डीआरडीओचे मोठे योगदान; राजनाथ सिंहांनी केले कौतुक