नागपूर Loksabha Election 2024 :भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक संकल्प पत्रासाठी महाराष्ट्रातून 10 लाख सूचना पाठवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यभरातील 33 हजार 323 भाजपा कार्यकर्ते प्रत्येक घरोघरी सूचना पत्रांचा बॉक्स घेऊन पोहोचतील. त्यानंतर सर्व सूचना भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात पाठवल्या जातील, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
1 लाख युवक सहभागी होतील :4 मार्च रोजी नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर राष्ट्रीय नमो युवा महासमेलनाचं आयोजन करण्यात आल आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातून 18 ते 35 वयोगटातील 1 लाख युवक या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर : 5 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोला, जळगाव, संभाजीनगर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अकोल्यातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, अमरावती या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते जळगाव येथे युवा संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी शाह संभाजीनगरमध्ये अहमदनगर, शिर्डी, जालना संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील.
नारी शक्ती वंदन कार्यक्रम : 6 मार्च रोजी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदार संघातील 5 हजार महिलांच्या उपस्थितीत नारी शक्ती वंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला ऑनलाइन संबोधित करणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.