पुणे (शिरूर) Wall Collapsed In Pune: कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) येथील आय टी डब्ल्यु कंपनी जवळील पार्किंग भिंत आज सकाळी अचानक कोसळली. या भिंतीखाली काही कामगार दबले गेले. यामध्ये एका कामगारांचा जागीच मृत्यू (Two Workers Died) झाला असून दुसऱ्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इतर तीन कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक मिळाली आहे. या घटनेत चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राजीव कुमार आणि मंजित कुमार अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत.
दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान: मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील आय टी डब्लू कंपनीजवळ कामासाठी आलेले कामगार हे पार्किंग जवळ उभे होते. आज सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांनी कंपनीच्या पार्किंगची भिंत कोसळली. या दुर्घटनेत नऊ दुचाकी गाड्या तर दोन सायकली आणि दोन चारचाकी गाड्या क्रं बोलेरो एम एच १२ यु एम ३७९३ आणि टेम्पो ट्रॅव्हलर एम एच १४ सी डबल्यू ४४४० या गाड्यांचं नुकसान झालं आहे. सदर घटनेत सुरक्षा भिंतींच्या बाजूला उभ्या असलेल्या चारचाकी, दुचाकी, कामगार आणि वाहतुकीसाठी असणाऱ्या बसचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.