अमरावती Tiger In Melghat : माकडांची अचानक सुरू झालेली धावपळ आणि आपल्या सोबत्यांसह परिसरातील सर्व शाकाहारी प्राण्यांना सावध करण्यासाठी विशिष्ट कॉलिंग अर्थात परिसरात भीती आहे. असा आवाज काढून वाघ आला आहे अशी सूचना माकडे द्यायला लागलेत. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारे माकड अगदी झाडाच्या उंच फांदीवर जाऊन काही वेळातच चिडीचूप झालेत. मेळघाटातील कोलकास या पर्यटन स्थळावर रविवारी दुपारी माकडांच्या हालचाली बदलताच या ठिकाणी आलेले पर्यटक देखील सावध झाले. आता वाघ दिसणार याची प्रतीक्षा पर्यटक करीत असतानाच परिसरात निरव शांतता पसरली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा सारा थरार पर्यटक अनुभवत असताना याच परिसरात दोन वाघांचे दर्शन पर्यटकांना घडले.
परिसरात दोन दिवसांपासून वाघांचा मुक्काम: मेळघाटात वाघांचे दर्शन हे अतिशय दुर्मिळ आहे. असं असलं तरी कोलकास परिसरात गत दोन दिवसांपासून नर आणि मादी असे वाघाचे जोडपे दोन दिवसांपासून दिसत असल्याची माहिती, सफारीमध्ये पर्यटकांना माहिती देणारे अशोक मावसकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. रविवारी सकाळी पावणे अकरा ते अकरा वाजेच्या दरम्यान अमरावतीवरून आलेले प्राध्यापक हेमंत खडके आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोलकासवरून परत सेमाडोहला आणताना कोलकासजवळ वाघाचे जोडपे दिसले. कोलकास जवळ वाघाने शिकार केली असून त्या ठिकाणी दोन-तीन दिवसांपासून वाघ असल्याचं देखील अशोक मावसकर म्हणाले. वाघ दिसल्यामुळं आमच्यासोबत असणारे पर्यटक अतिशय खुश झालेत. मेळघाटात वाघ नाही असं म्हणणाऱ्या पर्यटकांना वाघ दिसला, त्यामुळं पर्यटकांनी मोठ्या संख्येनं मेळघाटात यायला हवं अशी भावना, अशोक मावसकर यांनी व्यक्त केली.
वीस वर्षात पहिल्यांदाच मेळघाटात दिसला वाघ: सुमारे वीस वर्षांपासून मी मेळघाटात फिरतो आहे. मेळघाटच्या बाहेर प्राणी संग्रहालयात अनेकदा वाघ पाहिला. मेळघाटात मोठ्या संख्येने वाघ असल्याचं सांगितलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. रविवारी कुटुंबासह समाडोह ते कोलकास या जंगल सफारीसाठी गेलो असता कोलकास मधून बाहेर पडताना दूर बांबूच्या वनात वाघ बसल्याचा दिसला. आम्ही आमच्या कॅमेरातून त्याला टिपण्याचा प्रयत्न केला. कॅमेराखाली ठेवल्यावर त्या ठिकाणी एक नव्हे तर दोन वाघ असल्याचं दिसलं. पहिल्यांदा दिसलेला नर होता तर नंतर दिसलेली वाघीण असल्याचं वनविभागाचे गाईड अशोक मावसकर यांनी सांगितलं. त्या ठिकाणी वाघांनी शिकार केली होती आणि हाड फोडण्याचा आवाज येत होता. मेळघाटात वाघानं दर्शन दिलं हा अनुभव अतिशय आनंददायी असल्याचा मत प्राध्यापक डॉ. हेमंत खडके आणि त्यांच्या पत्नी संगीता खडके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
वाघाचं दर्शन म्हणजे देवाचं दर्शन: मेळघाटातील मोठ्या संख्येने असणाऱ्या कोरकू या आदिवासी जमातीमध्ये जंगलात वाघाचं दर्शन घडणं म्हणजे प्रत्यक्ष देवाचं दर्शन अशी मान्यता आहे. आम्हाला वाघ दिसल्याची माहिती इतरांना कळल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत. हा अनुभव खरंच अतिशय थरारक आणि आनंददायी होता. यावर काही लिहिता येईल याचा विचार मी करत असल्याचं देखील प्रा. डॉ. हेमंत खडके यांनी सांगितलंय.