महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; भाविकाला आयफोन मिळाला परत - IPHONE RETURNED DEVOTEE

साईबाबा संस्थानच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यानं सापडलेला आयफोन भाविकाला सुपूर्द केला आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे.

shirdi saibaba temple honest security guard return  forgotten iPhone to devotee
शिर्डी साईबाबा संस्थान (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2025, 9:39 AM IST

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला भाविकाचा गहाळ झालेला आयफोन मिळाला होता. या कर्मचाऱ्यानं तो आयफोन प्रामाणिकपणानं भाविकाला परत केल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.

नेमकं काय घडलं? : कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील प्रमोद चंद्रकांत उपरे हे साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानच्या भक्त निवासातील '500 रूम' प्रसादालयात त्यांनी जेवण केलं. मात्र, यावेळी ते आपला आयफोन तिथंच विसरले. साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागातील सुरक्षा रक्षक प्रदीप जगताप यांना प्रसादालयात आयफोन आढळून आला. त्यांनी हा आयफोन आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याकडं प्रामाणिकपणानं नेऊन दिला. काही काळानं त्या फोनवर भाविकाचा कुटुंबातील सदस्याचा फोन आल्यानंतर भाविकाची ओळख पटवून त्यांना हा फोन परत करण्यात आला.

सुरक्षा रक्षक प्रदीप जगताप यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

भाविकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद : साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या 500 रूम भक्त निवासातील प्रसादलयात प्रसाद घेण्यासाठी आलो होतो. आम्ही सगळे जण प्रसाद घेऊन तिथून निघून गेलो. बाहेर आल्यानंतर लक्षात आलं की आपला फोन तिथंच विसरलाय. परत प्रसादलयात गेलो तर तिथं फोन दिसून आला नाही. प्रसादलयात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असल्यानं आता आपला फोन मिळणार नाही असं वाटलं होतं. मात्र, संस्थानच्या प्रामाणिक सुरक्षा रक्षकामुळं आमचा फोन आम्हाला परत मिळाल्याचा आनंद यावेळी उपरे कुटुंबीयांनी व्यक्त केला.

15 लाखांच्या वस्तू भाविकांना सुपूर्द : साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी म्हणाले की, "दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. यातील काही भाविकांच्या मौल्यवान वस्तू गर्दीत गहाळ होतात. भाविकांच्या गहाळ झालेल्या वस्तू आमच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्या तर ते त्या वस्तू प्रामाणिकपणे सुरक्षा विभागात आणून जमा करतात. त्यानंतर आम्ही भाविकांची ओळख पटवून त्यांना त्यांची वस्तू परत देतो. गेल्या वर्षाभरात सोने, चांदी, मोबाईल, पैसे अशा तब्बल 15 लाख रुपयांच्या वस्तू आम्ही भाविकांना प्रामाणिकपणानं परत केल्या आहेत."

सुरक्षा रक्षकाचा सत्कार : "साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडं कायम वेगळ्या नजरेनं पाहिल्या जातं. मात्र, आमचे कर्मचारी खरोखरंच प्रामाणिक आहेत. आम्ही प्रामाणिकपणानं साईबाबांची आणि भाविकांची सेवा करतोय. याचं उत्तर आज आम्ही आमच्या प्रामाणिक कामातून दिलंय", असं सुरक्षा रक्षक प्रदीप जगताप म्हणाले. दरम्यान, भाविकाचा आयफोन परत करणाऱ्या प्रदीप जगताप यांचा साईबाबांची शाल आणि भेट वस्तू देऊन रोहिदास माळी यांनी यावेळी सत्कार केला.

हेही वाचा -

  1. साई संस्थानमधील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीने संस्थानाची प्रतिमा उंचावली; सापडलेल्या वस्तू भाविकांना सुपूर्द
  2. आला रे आला 'सिंबा' आला, साई मंदिराच्या सुरक्षा पथकात नव्या श्वानाची एन्ट्री
  3. भाविकांसाठी आनंदाची बातमी; आता तुम्ही झाला साईंचे व्हीआयपी भक्त, संस्थानच्या 'या' निर्णयामुळं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details