मुंबई- ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. अहमदनगरमध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना, 'औरंगजेबचा जन्म नरेंद्र मोदींच्या गावात झाला. इतिहास बघा. अहमदाबादच्या पुढे दाहोद नावाचे गाव आहे. औरंगजेबाचा जन्म तिथेच झाला. म्हणूनच गुजरातमध्ये ते आपल्याशी औरंगजेबासारखे वागतात.' संजय राऊत यांचे या वक्तव्यामुळे आता भाजपकडून त्यांच्यावर टीकेची जोड उठवली जात आहे. यावर आता संजयराव त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "भाजपला औरंगजेबावर एवढं प्रेम आलं आहे? औरंगजेब एक शासक होता आणि त्याने महाराष्ट्रावर वारंवार हल्ले केले. त्याचा जन्म गुजरातमध्ये झालाय. हे जर चुकीच असेल तर भाजपने आम्हाला इतिहास सांगितला पाहिजे की, औरंगजेबचा जन्म कुठे झाला होता? जस आम्ही गर्वाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यासारख्या महान योध्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला तर मी काय चुकीचा बोललो? ज्या मातीत औरंगजेबचा जन्म झाला त्या मातीचे काही गुणधर्म राज्यकर्त्यांना लागले असतील."
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "मोदी आणि शहा त्याचप्रमाणे महाराष्ट्रावरती हल्ले करत आहेत. महाराष्ट्र तोडण्याचा महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यात कोणाला मिरची लागण्याची काय गरज? मी कोणाला औरंगजेब नाही म्हटलं. ती एक विकृती आहे. जर महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही, हा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून, ही भाषा आम्ही बोलतो. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेलं आहे. त्यांना एवढ्या मिरच्या झोंबायच कारण काय, मोदींच्या बाजूला लावा औरंगजेबाचे फोटो, तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात, क्रूर, सूडबुद्धीने वागणारे."