शिर्डी : विधानसभा निवडणुकीनंतर शिर्डीत राजकीय पक्षांनी अधिवेशनाचा सपाटा लावलाय. मागील पंधरा दिवसात भाजपा आणि राष्ट्रवादीचं अधिवेशन शिर्डीत पार पडलं. हे दोन्ही अधिवेशन शनिवारी आणि रविवारी अशा सुट्ट्यांच्या दिवशी झाल्यानं संजय राऊत यांनी यावर आक्षेप घेतलाय. "शिर्डीत राजकीय पक्षांचं अधिवेशन म्हणजे साईभक्तांवर अतिक्रमण झालं," असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत, अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत हे रविवारी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते.
जनतेचा संयम सुटण्याची वाट पाहू नये : "शनिवारी आणि रविवारी सुट्ट्यांच्या दिवसात शिर्डीत साईबाबांच्या भक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. अशात राजकीय पक्ष अधिवेशन इथं भरवतात. या सगळ्या गर्दीचा परिणाम साईभक्तांवर होत असल्यानं शिर्डीत राजकीय पक्षांनी अधिवेशन घेऊ नये, तसेच इथल्या जनतेचा संयम सुटण्याची वाट त्यांनी पाहू नये," असं म्हणत संजय राऊतांनी शिर्डीत होणाऱया अधिवेशनाला विरोध केलाय.