ठाणेPandharpur Wari :महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माची लोकं जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होतात. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक अशी अनोखी परंपरा आहे. "पंढरिचा वास! चंद्रभागे स्नान! आणिक दर्शन विठोबाचे!" या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.
'या' डॉक्टरांनी दिल्या सेवा :अशा या पंढरपूर वारीत यंदा ४० व्या वर्षांत डॉ. विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचाचे शेकडो स्वयंसेवक आणि सेवाभावी डॉक्टर मंडळी आपली नि:स्वार्थ सेवा देतात. सालाबादप्रमाणे यंदाही डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्यावतीनं डॉ. राजेश मढवी यांनी आपल्या चमूसह नातेपुते येथील आरोग्य शिबिरात माऊलीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. या शिबिरात हजाराच्यावर माऊलींना अंगदुखी, पायदुखी, सर्दी, पडसे, ताप, अतिसार, उच्च रक्तदाब, जुलाब अशा विविध आजारांवर औषधोपचार, सलाईन मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला. त्याचबरोबर छोट्या शस्त्रक्रिया, टाके घालणे, पायदुखीसाठी तेल वगैरेने मसाज अशा सेवा देण्यात आल्या. यासाठी संस्थेच्यावतीनं सर्जन डॉ. विश्वास सापटणेकर, डॉ. राजेश मढवी, डॉ. बेके, डॉ. राव, डॉ. बापट, ज्योती हर्डीकर, रवींद्र कराडकर, विनय नाफडे, निशिकांत महाकाळ, राजेंद्र शहा, उदय पोवळीकर आणि इतर सेवेकरी सेवा देत होते.