महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"एक नंबर बाकावरील वकिलाकडे जसं लक्ष असतं तसं..."; फडणवीसांकडे इशारा करत रोहित पाटलांची विधानसभेत फटकेबाजी - ROHIT PATIL

तरुणांना आवश्यक व अपेक्षित चांगले कायदे सभागृहात तयार व्हावेत, विधिमंडळाच्या आश्वासन समितीप्रमाणे इतर समित्यांच्या कामकाजावर तुमचे अध्यक्ष म्हणून प्रभावी नियंत्रण असावे, असंही रोहित पाटील म्हणालेत.

Rohit Patil
रोहित पाटील (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2024, 6:12 PM IST

मुंबई-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटलांचे चिरंजीव आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेतील पहिल्याच भाषणात उपस्थितांची मने जिंकलीत. विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला, त्यावेळी रोहित पाटील बोलत होते.

चांगले कायदे सभागृहात तयार व्हावेत :यावेळी रोहित पाटलांनी विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नार्वेकरांचे अभिनंदन केले आणि राज्यातील नागरिकांच्या हितासाठी ज्या मागण्या विरोधी पक्ष करेल, त्या पूर्ण करण्यासाठी अध्यक्ष म्हणून तुम्ही लक्ष घालाल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. तरुणांना आवश्यक आणि अपेक्षित असलेले चांगले कायदे सभागृहात तयार व्हावेत आणि विधिमंडळाच्या आश्वासन समितीप्रमाणे इतर समित्यांच्या कामकाजावर तुमचे अध्यक्ष म्हणून प्रभावी नियंत्रण असावे, अशी अपेक्षाही रोहित पाटलांनी व्यक्त केलीय.

सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून येण्याचा मान : अध्यक्षांनी ज्याप्रमाणे विधानसभेचा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकावलाय, त्याप्रमाणे राज्यातील विधानसभेचा सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मी पटकावलाय. त्यामुळे तुमचे माझ्याकडे सर्वात तरुण आमदार म्हणून बारीक लक्ष राहील, असे रोहित पाटील म्हणालेत. तसेच तुम्ही ज्याप्रमाणे निष्णात वकील आहात, त्याप्रमाणे मीदेखील वकिली पूर्ण करतोय, त्यामुळे एक नंबर बाकावरील वकिलाकडे ज्याप्रमाणे तुमचे लक्ष असते, त्याप्रमाणे आपल्याकडेदेखील लक्ष द्यावे, असे पाटील म्हणालेत. पहिल्या क्रमाकांच्या आसनावर बसणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील वकील असल्याचा संदर्भ जोडून रोहित पाटलांनी ही मागणी केलीय. मुंबई राज्य असताना मुंबई विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले गणेश मावळणकर हे नंतर लोकसभेचे अध्यक्ष झाले होते. त्याचा संदर्भ घेत राहुल नार्वेकरांनी महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष म्हणून चांगले काम केलेले आम्ही बघितले आहे, त्यांना परंपरेप्रमाणे दिल्लीला पाठवायला हरकत नव्हती, असे रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणालेत.

'अमृताहूनही गोड नाम तुझे देवा' :संत तुकाराम यांच्या 'अमृताहूनही गोड नाम तुझे देवा' या अभंगाचा त्यांनी उल्लेख केला आणि संतांच्या वाणीतून आपले नाव इतक्या गोड पद्धतीने घेतले गेलेत, त्यामुळे आगामी काळात तुमच्याकडून विरोधी पक्षांना गोड पद्धतीची वागणूक द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. पुराणातही अमृताला वेगळे महत्त्व होते आणि आजही, असे रोहित पाटील म्हणालेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव अमृता असल्याने मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर यावेळी हास्य आलंय.

हेही वाचा :

  1. "विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय..."; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
  2. समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम असल्यासारखं वागत आहे- आदित्य ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details