चंद्रपूर- महायुतीच्या लोकसभेचा प्रचाराचा आज महत्त्वाचा टप्पा असणार आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पहिली सभा चंद्रपूरमध्ये घेणार आहेत. चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार तथा मंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूर दौऱ्यावर येणार आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि महायुतीमधील नेत्यांची बैठकदेखील होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूर दौऱ्यापूर्वी एक्स मीडियावर पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीएच्या उमेदवारांच्या भव्य विजयाचा निश्चय केला आहे. आज चंद्रपूरमध्ये सायंकाळी ५ वाजता जनतेचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळेल."
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिलला रामटेकमधील सभेलादेखील संबोधित करणार आहे. त्या ठिकाणी पंतप्रधान हे दीक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत. चंद्रपूर आणि रामटेकमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक ४८ लोकसभेच्या जागा आहेत. राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची आजची सभा महत्त्वाची असणार आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ कसा आहे: चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदारसंघात चंद्रपुर जिल्ह्यातील 4 विधानसभा आणि यवतमाळ जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णी या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. सहाही मतदारसंघामध्ये १८ लाख २९ हजार १११ मतदार आहे. तर ८ लाख ८७ हजार ३१३ महिला तर ९ लाख ४१ हजार ७४८ पुरुष मतदार आहेत.
मागील वेळेस कशी मते मिळाली होती?मागील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत वंचितचा फॅक्टर हा प्रभावी होता. वंचितच्या उमेदवारानं इथं तब्बल एक लाखापेक्षा अधिकची मतं मिळवली. वंचितकडून राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसचे बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली. भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ अमित शाह येणार होते. मात्र, ऐनवेळी शाह यांचा दौरा रद्द झाला होता. गेल्या निवडणूकीत बाळू धानोरकरांना ५ लाख ५९ हजार ५०७ मतं मिळाली होती. तर भाजपाचे हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७४४ मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांना १ लाख १२ हजार ७१ मते मिळाली होती. बाळू धानोरकर यांनी अहीर यांचा ४४ हजार ७६३ मतांनी पराभव केला होता.
दारुचा मुद्दा पुन्हा लोकसभेचा चर्चेत-सुधीर मुनंगटीवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना धानोरकर कुटुंबाकडं दारूचे १७ दुकाने आहेत. त्यांना १७ चे ७० दारूची दुकाने करायची आहेत, असा आरोप केला. मी देशीसाठी नव्हे देशासाठी लढतोय, असा टोलादेखील धानोरकर यांना लगावला. चंद्रपूर जिल्ह्यात 2015 मध्ये दारुबंदी करण्यात आली होती. बाळू धानोरकर यांच्या मालकीची दारुची दुकानं आहेत. तर भाजपा नेते हंसराज अहीर यांचा दुधाचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यामुळं मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून दूधवाला की दारुवाला हा मुद्दा प्रचारात आणण्यात आला. त्यावर दारूबंदी असताना दारू कशी मिळते, असा बाळू धानोरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दारूबंदी असताना उपलब्ध होणारी दारू आणि वाढणाऱ्या गुन्हेगारीचा भाजपाला मागील लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता.
धानोरकरांचे निधन पण पोटनिवडणुक टळली : मे 2023 मध्ये खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. यानंतर या जागेवर पोटनिवडणुक होणार अशी शक्यता होती. मात्र पोटनिवडणुक घेण्यात आली नाही. धानोरकर यांच्या निधनामुळे येथे त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती, पोटनिवडणुक झाल्यास काँग्रेसकडून ही उमेदवारी त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांना मिळणार होती. अशावेळी प्रतिभा धानोरकर ह्या विजयी होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. अशावेळी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत याचा लाभ धानोरकर यांनाच मिळणार होता. मात्र या जागेवर निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुक जाहीर झाली नाही.
हेही वाचा-
- मी देशासाठी लढतोय, 'देशी'साठी नाही; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिभा धानोरकरांवर जोरदार टीका - Lok Sabha Election 2024
- माझी उमेदवारी म्हणजे १० महिन्याच्या संघर्षाचा विजय; प्रतिक्रिया देताना प्रतिभा धानोरकर झाल्या भावूक - Pratibha Dhanorkar